कोल्हापूरात डॉक्टर महिलेवर अत्याचार; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग, आरोपी अटकेत

कोल्हापूरात डॉक्टर महिलेवर अत्याचार; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग, आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क 

कोल्हापूर : शहरातील राजारामपुरी परिसरात एका डॉक्टर महिलेवर ओळखीच्या तरुणाने अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार करत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शक्ती विक्रम भोसले (२८, शाहूपुरी) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३० एप्रिल रोजी दुपारी घरी एकटी असताना आरोपीने पतीला भेटण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. घरात कोणी नसल्याची खात्री करून त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेदरम्यान महिलेने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे महिला मानसिकदृष्ट्या खचली होती.

दरम्यान, १ मे रोजी रात्री आरोपीने स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्याचाराचा व्हिडिओ पीडितेला पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ नष्ट करण्यासाठी त्याने एक लाख रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सततच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने २ मे रोजी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon