२१ वर्षांच्या कर्तव्यदक्ष सेवेचा गौरव; पोलीस निरीक्षक हेमंत ढोले यांना महासंचालक सन्मानचिन्ह

२१ वर्षांच्या कर्तव्यदक्ष सेवेचा गौरव; पोलीस निरीक्षक हेमंत ढोले यांना महासंचालक सन्मानचिन्ह

पोलीस महानगर नेटवर्क 

डोंबिवली : पोलीस दलातील तब्बल २१ वर्षांच्या निष्कलंक, कर्तव्यदक्ष आणि उल्लेखनीय सेवेबद्दल मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत ढोले यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ प्रदान करून गौरविण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान देण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस दलातील हा सन्मान अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यासाठी किमान १५ वर्षांची निर्दोष सेवा, कोणतीही शिस्तभंगाची कारवाई नसणे, १०० पेक्षा अधिक गुन्ह्यांच्या उकलप्रकरणी बक्षिसे तसेच मागील १० वर्षांतील सातत्यपूर्ण ‘A’ किंवा ‘A+’ श्रेणीचे सेवा मूल्यांकन अशा कठोर निकषांची पूर्तता आवश्यक असते.

ढोले यांनी या सर्व निकषांची पूर्तता करताना उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, खंडणी, पोलिसांवर हल्ले तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नावावर १५० हून अधिक बक्षिसांची नोंद आहे.

आपल्या २१ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे, खडकपाडा, कल्याण परिमंडळातील पोलीस उपायुक्त पथक, ठाणे खंडणीविरोधी पथक, पुणे नार्कोटिक्स शाखा, सीआयडी, कोळसेवाडी तसेच सध्या मानपाडा पोलीस ठाणे येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि प्रामाणिकपणाची छाप उमटवली आहे.

सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना ढोले म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या कुटुंबीयांचा, सहकाऱ्यांचा आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा आहे. यापुढेही समाजसेवेसाठी अधिक निष्ठेने आणि जबाबदारीने कार्य करत राहीन.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon