बारामतीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय; २.१८ लाख मताधिक्याने नवा इतिहास
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात नवा इतिहास घडवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर विश्वासाची मोहोर उमटवली.
या विजयासह सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या. याआधी १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे (माई) यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत बारामतीचे प्रतिनिधित्व केले होते. तब्बल ६४ वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्व बारामतीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.
मालतीबाई शिरोळे यांनी १९६२ ते १९६७ या काळात सहकार चळवळ, ग्रामीण विकास आणि महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत ठसा उमटवला होता. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार यांनी बारामतीतून पहिल्यांदा विजय मिळवत आपल्या दीर्घ आणि प्रभावी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढील काळात या मतदारसंघावर पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले.
अजित पवार यांनीही अनेक वेळा या मतदारसंघातून विजय मिळवत आपली मजबूत पकड सिद्ध केली होती. त्यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मिळालेले प्रचंड मताधिक्य हे सहानुभूतीची लाट, संघटनशक्ती आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांचा परिणाम मानला जात आहे.
दरम्यान, या दणदणीत विजयामुळे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर बारामतीच्या विकासाची मोठी जबाबदारी आली असून, आगामी काळात त्या कोणते निर्णय घेतात आणि मतदारांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.