मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; दुबईहून आणलेले १.८ कोटींचे सोने-गॅझेट्स जप्त

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; दुबईहून आणलेले १.८ कोटींचे सोने-गॅझेट्स जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : तस्करीविरोधात मुंबई सीमा शुल्क विभागाने विमानतळावर मोठी कारवाई करत दुबईहून आणलेले सुमारे १.८ कोटी रुपये किमतीचे सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉस्मेटिक्स आणि विदेशी सिगारेट जप्त केले. १ आणि २ मे दरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.

सीमा शुल्क विभागाच्या एअरपोर्ट कमिशनर पथकाने ‘स्पॉट चेक’ आणि ‘अ‍ॅडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम’च्या आधारे संशयित प्रवाशांची तपासणी केली. दोन स्वतंत्र प्रकरणांत दुबईहून आलेल्या अमिरातच्या EK-502 विमानातील प्रवाशांकडून एकूण ८४.३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी विमानाची सखोल झडती घेतली असता मागील बाजूच्या शौचालयातील कमोडमध्ये तपकिरी टेपने गुंडाळलेली आठ संशयास्पद पाकिटे आढळून आली. अत्यंत गुप्तपणे लपवून तस्करी करण्याचा हा प्रयत्न कस्टम्सच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला.

याशिवाय, स्पाईसजेटच्या OSG-5114 विमानाने दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून ६९५ ग्रॅम २४ कॅरेट कच्चे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत सुमारे ९५.३२ लाख रुपये असून, संबंधित प्रवाशाला सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तूंच्या संदर्भात सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे मोठे तस्करी रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. विमानतळावरील कडक सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीमुळे तस्करीचे प्रयत्न हाणून पाडण्यात कस्टम्सला यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon