बांद्रा पश्चिमेत ड्रग्स विक्रीचे आरोप; स्थानिकांकडून ‘संघटित रॅकेट’चा दावा, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

बांद्रा पश्चिमेत ड्रग्स विक्रीचे आरोप; स्थानिकांकडून ‘संघटित रॅकेट’चा दावा, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

सुधाकर नाडार / मुंबई 

मुंबई : बांद्रा (पश्चिम) परिसरात ड्रग्सची खुलेआम विक्री होत असल्याचे गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, या मागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा दावा समोर आला आहे. गुरुनानक रोड, स्टेशन परिसर तसेच तलाव परिसरात सातत्याने अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काही स्थानिकांच्या आरोपानुसार, या कथित नेटवर्कमध्ये काही व्यक्तींचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून ड्रग्सचा पुरवठा केला जातो. एका तरुणाकडून ऑटोमधून गांजा विक्री होत असल्याचेही सांगितले जात आहे. या संदर्भातील एक कथित व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने अनौपचारिक चौकशीत तो एका मोठ्या नेटवर्कसाठी काम करत असल्याचे सांगितल्याचा दावा केला जात आहे. तसेच, पोलिस कारवाईदरम्यान लहान पातळीवरील विक्रेत्यांवरच कारवाई होते, तर मुख्य सूत्रधारांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला आहे.

या कथित रॅकेटशी संबंधित काही जणांचे वास्तव्य बांद्रा रिक्लेमेशन ट्रान्झिट कॅम्प परिसरात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या भागात निर्भयपणे ड्रग्सची विक्री सुरू असल्याची भावना नागरिकांत आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून बांद्रा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. परिसरात ड्रग्स विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याचा दावा नागरिकांनी केला असून, मोठ्या कारवाईचा अभाव असल्याची टीका केली जात आहे.

ड्रग्सची सहज उपलब्धता तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढवू शकते आणि त्यातून गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते आणि या कथित प्रकारांवर ठोस कारवाई कधी होते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon