१२ वर्षांनंतर उलघडलं खुनाचं रहस्य; अपहरण करून हत्या, प्रेताची जंगलात विल्हेवाट
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : सन २०१४ मध्ये अपहरण झालेल्या तरुणाचा खून करून प्रेताची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावल्याचा थरारक गुन्हा तब्बल १२ वर्षांनंतर उघडकीस आला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा, घटक-३ (कल्याण) पथकाने या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी, डोंबिवली) याचे २०१४ मध्ये अपहरण झाल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चंद्रकांत बाळाराम गायकर (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता संपूर्ण कटाचा उलगडा झाला.
जमीन विकासाच्या व्यवहारातून झालेल्या आर्थिक वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) याने करण बागुल याचे अपहरण केले. त्यानंतर दावडी येथील एका कार्यालयात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. या गुन्ह्यात गायकर व सुरेश गोपाल देगावत उर्फ छोटू (वय ३२) यांनी मदत केली.
खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह कारमधून मुरबाड तालुक्यातील बारवी धरण परिसरातील जंगलात नेऊन टाकला. त्या वेळी सापडलेले अज्ञात प्रेत आणि बागुल याच्या बेपत्ता प्रकरणाचा संबंध तपासाअंती स्पष्ट झाला.
या प्रकरणात आता भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव व सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण पथकाने केली.