दिंडोरीत वैध मापनशास्त्र निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; २४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

दिंडोरीत वैध मापनशास्त्र निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; २४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

पोलीस महानगर नेटवर्क 

दिंडोरी : पेट्रोल पंपाच्या नोझल मापकाचे प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वैध मापनशास्त्र विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई दिंडोरी-वणी रस्त्यावरील अवनखेड शिवारात करण्यात आली.

अवनखेड शिवारातील ओम साई पेट्रोल पंपाच्या मालकाने वार्षिक परीक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय शुल्क भरून पडताळणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार वैध मापनशास्त्र विभागाचे निरीक्षक भगवान डोल्हारे हे तपासणीसाठी पेट्रोल पंपावर आले होते.

पेट्रोल पंपाची पाहणी केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त चार नोझलसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये, अशा एकूण २४ हजार रुपयांची मागणी डोल्हारे यांनी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे २४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना भगवान डोल्हारे यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस हवालदार विनोद चौधरी आणि अनिल गांगोडे यांनी केली. भगवान डोल्हारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon