चेंबूरमध्ये फुटपाथवरील अवैध कंटेनरमुळे नागरिक त्रस्त; कारवाईच्या मागणीने तक्रारींचा पाऊस

चेंबूरमध्ये फुटपाथवरील अवैध कंटेनरमुळे नागरिक त्रस्त; कारवाईच्या मागणीने तक्रारींचा पाऊस

मुंबई : चेंबूर पश्चिमेतील मनपा प्रभाग क्रमांक १५० अंतर्गत पी. एल. लोखंडे मार्गावरील गुलशन बाग परिसरात लजीज हॉटेलसमोर फुटपाथवर अवैधरित्या ठेवण्यात आलेल्या कंटेनरमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. या कंटेनरमुळे परिसरात असामाजिक घटकांची वर्दळ वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंटेनर फुटपाथवर उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. तसेच येथे दिवस-रात्र काही जण बसून मद्यपान करतात, अमली पदार्थांचे सेवन करतात आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करतात. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार चेंबूर ट्रॅफिक पोलीस आणि टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे घडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त तसेच महापौर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित कंटेनरमध्ये बसणाऱ्या काही व्यक्तींविरोधात यापूर्वीही तक्रारी झाल्या आहेत. काही जणांवर मारहाण आणि दहशत निर्माण केल्याचे आरोप असून, टिळकनगर पोलीस ठाण्यात त्यासंदर्भातील नोंदी असल्याचेही सांगितले जाते.

स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक आजम लब्बइनी यांनीही या प्रकाराला विरोध दर्शवत संबंधित कंटेनर हटवण्याची मागणी केली आहे. “मी स्वतः या संदर्भात तक्रार केली आहे; मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी महापौर रितू तावडे तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडेही निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून फुटपाथ मोकळा करावा आणि परिसरातील असामाजिक हालचालींवर आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon