भरधाव डम्परचा कहर! नव्या ‘ऍनिमल पास’ पुलाला जोरदार धडक; चालक गंभीर
पालघर / नवीन पाटील
मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावरील पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील नावझे गावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री भरधाव डम्परने वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या ‘ऍनिमल पास’ पुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात डम्परचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डम्परचा डम्प उचललेल्या अवस्थेतच वाहन पुढे नेण्यात आल्याने तो थेट पुलाच्या गर्डरला जाऊन धडकला. या धडकेत पुलाच्या लोखंडी संरचनेला काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित पूल नुकताच बांधून पूर्ण झाला असून अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.
दरम्यान, या मार्गावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी खामलोली परिसरात लोखंडी पादचारी पुलाला डम्परची धडक बसली होती. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर दिवस-रात्र बेकायदेशीर अवजड वाहतूक सुरू आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असतानाही ठेकेदारांकडून रेस्ट एरियासाठी माती-मुरूम वाहतुकीसाठी नव्याने तयार रस्त्याचा वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
नावझे व धुकटन परिसरात सध्या भरावाचे काम सुरू असून, शेकडो ट्रक या मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे कामगार आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
कोट….
“डम्परचा डम्प उचललेल्या अवस्थेत पुढे नेल्यामुळे पुलाला धडक बसली. प्राथमिक माहितीनुसार पुलाचे मोठे नुकसान झालेले नाही. ठेकेदार आणि चालकाविरोधात कारवाई करण्यात येईल. तसेच पुलाची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मासवण ते सोनावे दरम्यानचा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही,”
– प्रकल्प संचालक, सुहास चिटणीस.