रे रोड स्थानकाजवळ पोलिस व्हॅनशेजारीच ड्रग्स विक्रीचा आरोप; स्थानिकांकडून तात्काळ कारवाईची मागणी
सुधाकर नाडार
मुंबई : रे रोड पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पोर्ट ट्रस्ट रोड (दारुखाना जंक्शन) परिसरात पोलिसांच्या व्हॅनपासून अवघ्या २५ फूट अंतरावर ड्रग्सची उघडपणे विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या ईस्ट-वेस्ट कनेक्टिंग ब्रिजच्या सुरुवातीलाच २४ तास पोलिसांची व्हॅन तैनात असतानाही गांजा, अमली पदार्थ आणि बंदी घातलेल्या कफ सिरपची विक्री सुरू असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
या रॅकेटचा सूत्रधार यासीन उर्फ ‘बांग्लादेशी’ असल्याचे सांगितले जात आहे. तो काही पेडलर्समार्फत परिसरात अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचा आरोप आहे.
माहितीनुसार, २०२४ मध्ये माटुंगा येथील एसआयडब्ल्यूएस शाळेजवळील चार रस्ता परिसरातही यासीन ड्रग्स विक्री करत होता. त्यावेळी माटुंगा पोलिसांनी त्याच्या एका साथीदाराला अमली पदार्थांसह अटक केली होती. तसेच, मुंबई महापालिकेच्या मदतीने त्या भागातील बेकायदेशीर अड्डे हटविण्यात आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, यासीनचा मुक्काम अँटॉप हिलमधील बंगालीपुरा येथे असून, त्याने टिटवाळा येथे दोन खोल्या आणि एक गोदाम भाड्याने घेतले आहे. भिवंडी येथून अमली पदार्थ आणून ते टिटवाळ्यातील गोदामात साठवले जात असल्याचा आरोप आहे. यासाठी त्याने एक टेंपोही घेतल्याचे सांगितले जाते.
गेल्या दोन वर्षांपासून रे रोड परिसरात काही स्थानिक गुंडांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्स विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मागील दोन महिन्यांपासून ब्रिजजवळ पुन्हा ही हालचाल वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
यासीनला एका तथाकथित राजकीय व्यक्तीकडून संरक्षण मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने हा व्यवसाय भागीदारीत सुरू असल्याचे सांगितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र, यामुळे एका मोठ्या राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या प्रकरणातील संभाषणाचे ऑडिओ, व्हिडिओ आणि इतर पुरावे संबंधित अधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ राजकीय नेत्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस व्हॅनच्या इतक्या जवळ उघडपणे ड्रग्स विक्री सुरू असणे ही गंभीर बाब असून, सेव्री पोलिस आणि अँटी नार्कोटिक्स सेलने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.