रायगडला हादरवून सोडणाऱ्या लोणेरे हत्याकांडाचा उलगडा; प्रियांकाला मारणारा नराधम सापडला, मुंबईतून अनिसला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी मुंबई आणि ठाणे परिसरातून अटक केली आहे. आरोपीला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोणेरे येथील ‘ओमकार लॉज’मध्ये २१ एप्रिल रोजी एका तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पल्लवी पुण्याला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती, मात्र आरोपी अनिसने तिला लॉजवर नेले. २१ एप्रिल रोजी सकाळी लॉजमधील सफाई कर्मचारी दरवाजा उघडण्यासाठी गेला असता, हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत आरोपी अनिस तेथून पसार झाला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार ते पाच पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून अनिस मालदारला बेड्या ठोकल्या.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिस आणि पल्लवी यांचे गेल्या काही दिवसांपासून बोलणे सुरू होते. लॉजवर नेल्यानंतर अनिसने पल्लवीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी रायगड पोलिसांनी अनिसवर हत्या, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.