लग्नाच्या वरातीतील झालेल्या भांडणाच्या जुन्या वादातून भावाने चुलत भावालाच संपवलं; चार आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी एका घरात लग्नाचा मोठा उत्साह सुरू होता. डीजेचा दणदणाट, नातेवाईकांची गर्दी आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची मिरवणूक रस्त्यावर निघाली आणि सगळे मनसोक्त नाचत होते. पण या आनंदाच्या क्षणातच एक छोटासा वाद पेटला आणि पुढे त्याने भीषण वळण घेतलं.
तेजस पिलाने (२४) आणि त्याचा चुलत भाऊ विशाल खोपडे हे दोघेही त्या मिरवणुकीत होते. नाचण्यावरून दोघांमध्ये अचानक वाद झाला. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी समजावून प्रकरण शांत केलं आणि मिरवणूक पुढे सरकली. सगळ्यांना वाटलं वाद संपला, पण विशालच्या मनात मात्र तो राग तसाच राहिला. काही दिवस गेले, पण राग कमी झाला नाही. उलट तो सूडात बदलला. विशालने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून तेजसला संपवण्याचा कट रचला.
२५ एप्रिल रोजी तेजस कात्रज सर्व्हिस रोड परिसरात एकटा होता. हीच संधी आरोपींनी साधली. अचानक त्यांनी त्याला गाठलं आणि कोणतीही चर्चा न करता थेट धारदार शस्त्राने हल्ला केला. काही क्षणांतच तेजस रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि आरोपी फरार झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. काही तासांतच संपूर्ण परिसर हादरला. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात आली. यात विशाल खोपडे, अभिषेक खोपडे, हरिश्चंद्र धुळे आणि आदिनाथ कसबे यांचा समावेश आहे.
एक छोटासा वाद…काही दिवसांचा राग…आणि शेवटी एका तरुणाचा जीव गेला. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की रागावर नियंत्रण सुटलं तर त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात. या प्रकारणानंतर कात्रज परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भावानेच भावाचा खून केल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.