ठाणे जिल्हा परिषदेत लाच प्रकरण; दोन अधिकारी रंगेहात जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. निवृत्त शिक्षकाविरोधातील विभागीय चौकशी बंद करून सेवानिवृत्तीविषयक आर्थिक लाभ मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी तब्बल १ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर सोमनाथ आरे (४४) आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत अनंत खंडागळे (५६) यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार हे ६२ वर्षीय निवृत्त शिक्षक असून त्यांच्या विरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणारे अंशदान व उपदान मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी ८० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे.
तक्रारदाराने २१ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर २२ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी उर्वरित २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शंकर आरे यांना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात श्रीकांत खंडागळे यांचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे आणि त्यांच्या पथकाने केली. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.