शिवाजी नगरमध्ये युवकाची हत्या; सहा आरोपी अटकेत

शिवाजी नगरमध्ये युवकाची हत्या; सहा आरोपी अटकेत

रवि निषाद / प्रतिनिधी 

मुंबई : गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात एका युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक नगर येथे राहणारा आरिफ हा युवक २२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.४५ ते ४.०० वाजण्याच्या सुमारास काही जणांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करून आरिफवर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी मो. सिराज शब्बीर जमादार (वय २८) आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला.

जखमी आरिफ याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

मुंबई परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी सांगितले की, या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेतील सर्व सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon