मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं

मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यातील भाजप महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत, २०२९ मध्ये हे विधेयक मंजूर होईल असे म्हटले. तसेच, विधेयक नामंजूर होण्यास विरोधकांना जबाबदार धरत, ते महिलाविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील वरळी डोम येथे भाजप महायुतीच्यावतीने जन आक्रोश महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, याच संमलेनासाठी जाताना आंदोलकांकडून वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेनं चक्क मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

मुंबईत भाजपकडून महिलांच्या सन्मानासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी वाहतूक कोंडी झाल्याने अनेकजण अडकून पडले होते. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला, ताटकळत बसावे लागल्याने एका महिलेकडून थेट मोर्चास्थळी जाऊन गोंधळ घालण्यात आला. विशेष म्हणजे, मंत्री गिरीश महाजन यांना देखील यावेळी ह्या महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. महिलेनं मंत्री महोदयांपुढे आपला संताप व्यक्त करत, शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचं म्हटलं. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात? असा प्रश्न करत महिलेने महाजन यांना देखील सुनावले. महिलेचा हा व्हिडिओ व्हायरलो होत असून विरोधकांकडूनही शेअर केला जात आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील या व्हिडिओचा संदर्भ देत भाजपच्या आंदोलनावर टीका केलीय. दरम्यान, यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये देखील वाद होताना दिसून आलं.

अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात. पण, खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. आता, त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असेही रोहित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटलं.

महायुतीमधील शिवसेना महिला आघाडी मंगळवारच्या महायुती मोर्चाला अनुपस्थित होती, पक्षाकडून आदेश नसल्याने मोर्चला अनुपस्थित असल्याचे महिला आघाडीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, काल मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा मोर्चा असेल असे सांगितले होते. मात्र, महायुतीचे दोन्ही पक्षातील नेते आणि महिला नेत्या या मोर्चात दिसल्या नाहीत, भाजपकडून आणि पक्षाकडून आदेश नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon