क्राइम ब्रांचची धडक कारवाई : अल्पवयीन शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

क्राइम ब्रांचची धडक कारवाई : अल्पवयीन शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

सुधाकर नाडार / प्रतिनिधी 

मुंबई : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन शोषणाच्या गंभीर प्रकरणात क्राइम ब्रांच युनिट ६ ने मोठी कारवाई करत मुख्य फरार आरोपी बाबु आयनल खान उर्फ बाबु गुरु उर्फ बाबु हिजडा (३०) याला अटक केली आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपीने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने मुलींचे कपडे परिधान करायला लावले व तृतीयपंथी म्हणून वावरायला भाग पाडले. त्यानंतर त्याच्याकडून लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यास भाग पाडल्याचा तसेच पुरुष ग्राहकांसोबत जबरदस्तीने शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्राइम ब्रांच युनिट ६ ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी नवी मुंबईतील वाशी-कोपरी गाव परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुमारे २४ तास पाळत ठेवून सापळा रचला. आरोपीला संशय आल्याने तो साथीदारांसह कारने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र पोलिसांनी पाठलाग करून ट्रॉम्बे येथील पांजरापोल जंक्शनजवळ त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग उघड झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon