भोंदू फकीरबाबाकडून समस्या सोडवण्याच्या नवाखाली दोन तरुणी आणि एका महिलेसोबत भयंकर प्रकार; भोंदू फकिराला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नाशिकच्या भोंदू अशोक खरातने तंत्र-मंत्र आणि जादूच्या नावाखाली अनेक महिलांवर अत्याचार केले. त्याच्या या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरले आहे. त्याने आपल्या या कृत्यांमधून हजारो कोटींची माया जमवली आहे. विशेष म्हणजे खरातचे प्रकरण समोर येताच अनेक राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचा आरोप होतोय. दरम्यान, खरातच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांचा गैरफायदा घेतल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता एका भोंदू फकीरबाबाने दोन तरुणी आणि एका महिलेसोबत भयंकर प्रकार केला आहे. समोर आलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. पोलिसांनी या भोंदू फकिराला अटक केले आहे. त्याने समस्या सोडवण्याच्या नवाखाली एका तरुणीचा विनयभंग केला आहे. हा फकीर बाबा महिलांना त्यांच्या समस्या सांगून उपचाराच्या नावाखाली आधी बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा असा आरोप आहे.या भोंदू फकीर बाबाचे नाव इरफान नियाज अहमद असे आहे. त्याचे वय ३४ वर्षे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील बहराइच येथील रहिवासी आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असून स्वतःला तो फकीर बाबा असल्याचे सांगतो.
या फकीराने कांदिवलीत राहणाऱ्या एका स्त्रीला स्वतःची बाबा म्हणून ओळख करून दिली. तसेच तुझे पती आता या जगात नाहीत. तुझ्यावर दोष आहे. हा दोष दूर करण्यासाठी तुला एक पद्धत अवलंबावी लागेल, असे त्या महिलेला सांगितले. त्यानंतर त्यानंतर बाबाने ती संंबंधित स्त्री आणि तिच्या दोन मुलींसोबत विधी करायला सुरुवात केली. या विधीदरम्यान स्त्री आणि तिच्या दोन मुली बेशुद्ध पडल्या. त्यानंतर फकिराने एका मुलीचा विनयभंग केला, असा आरोप आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी फकीरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78, 123, 3 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्याला पोलिसांनी 13 तारखेला अटक केली आहे. सध्या बाबांना पोलीस कोठडी मिळाली आहे. फकीर बाबा तरुंगात आहे. लवकरच पोलीस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.