रायते पुलावर भीषण तिहेरी अपघात; १२ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावरील उल्हास नदीवरील रायते पुलावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सुमारे १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिमेंट मिक्सर डंपर, कार आणि काळी-पिवळी टॅक्सी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही प्रवासी वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
प्राथमिक माहितीनुसार, पुलावर सिमेंट मिक्सर आणि समोरून येणाऱ्या वाहनांमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य राबविण्यात आले.
दरम्यान, या अपघातामुळे कल्याण-मुरबाड मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक वळवण्यास सुरुवात केली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेचा पंचनामा सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.