एआयच्या मदतीने एफआयआर नोंदणी वेगवान; पुणे पोलिसांचा ‘स्मार्ट’ पायलट प्रयोग

Spread the love

एआयच्या मदतीने एफआयआर नोंदणी वेगवान; पुणे पोलिसांचा ‘स्मार्ट’ पायलट प्रयोग

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : नागरिकांच्या सेवेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एफआयआर नोंदणी प्रणालीचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे. या प्रणालीमुळे तक्रार नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त चिलूमुला रजनीकांत यांनी सांगितले की, पारंपरिक पद्धतीने एफआयआर नोंदवण्यासाठी साधारण ३ ते ४ तासांचा कालावधी लागत होता. मात्र, एआय-आधारित प्रणालीमुळे ही प्रक्रिया अवघ्या २० ते ३० मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पाची चाचणी सध्या बाणेर पोलीस ठाणे येथे पायलट स्वरूपात सुरू असून, ‘एंड-टू-एंड’ डिजिटायझेशनवर भर देण्यात आला आहे. तक्रार नोंदविताना लागणारा वेळ आणि कागदपत्रांची गुंतागुंत कमी करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

पूर्वी नागरिकांना तक्रार नोंदवताना विविध फॉर्म भरावे लागत आणि अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधावा लागत असे. मात्र, नव्या प्रणालीमध्ये एआय तक्रारीतील मजकूर ओळखून संबंधित कायदेशीर कलमे सुचवते आणि एफआयआर चा मसुदा तयार करते. त्यानंतर पोलीस अधिकारी तपासून अंतिम एफआयआर नोंदवतात.

याशिवाय, या प्रणालीमध्ये ‘व्हॉइस-टू-टेक्स्ट’ सुविधा देण्यात आली असून, नागरिकांनी सांगितलेली माहिती थेट मजकूरात रूपांतरित होते. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे.

बाणेर पोलीस ठाण्यात हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरत असून, पुढील टप्प्यात तो शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही विस्तारण्याबाबत विचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon