पोलिसांकडूनच पोलिसांवर हल्ला!
बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनकडून
हल्ला; दोन कर्मचारी जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
बुलढाणा – जिल्ह्यातील तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांमध्येच झालेल्या धक्कादायक संघर्षाची घटना समोर आली आहे. गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन कर्मचारी जखमी असून प्रकरणी दाखल करण्यात आला आहे.
तामगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी कवठळ गाव परिसरात रात्री गेले होते. यावेळी त्यांना दोन संशयित व्यक्ती दिसल्या.पोलिसांनी त्यांना रात्रीच्या वेळी परिसरात का फिरत आहात, अशी विचारणा केली असता वाद झाला. हा वाद इतका वाढला की संबंधित संशयितांनी पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
हल्ला करणारे दोघेही अकोला पोलीस दलात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे अशी आहेत. तर तामगाव पोलिसातील संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोघे यामध्ये जखमी झाले. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करत आहेत. मात्र अकोला पोलीस दलातील हे कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी नेमके काय करत होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या घटनेमुळे पोलीस दलातच खळबळ उडाली असून प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.