संभाजीनगरमध्ये प्रेमाचा थरारक शेवट!
भरदिवसा आणि गजबजलेल्या पंपावर प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरुन हत्या; आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपति संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात एका प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून धक्कादायक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २७ वर्षीय पूजा सुदाम गावंडे या तरुणीचा तिच्याच प्रियकराने भरदिवसा गळा चिरून निर्घृण खून केला. गुरुवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत पूजा गावंडे ही करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होती. गुरुवारी दुपारी ती नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत असताना, आरोपी सत्यम रावसाहेब गावंडे (३२) हा त्या ठिकाणी आला. सत्यमने आपल्याकडील धारदार चाकूने पूजावर हल्ला चढवला. त्याने थेट पूजाचा गळा चिरल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
हे संपूर्ण हत्याकांड पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हिडीओमध्ये आरोपी अत्यंत क्रूरपणे हल्ला करताना दिसत असून, घटनेनंतर परिसरात एकच पळापळ झाली. भरदिवसा आणि गजबजलेल्या महामार्गावरील पंपावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पूजा आणि सत्यम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे. याच वादातून सत्यमने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी सत्यम गावंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.