मॅट्रिमोनियल साईटवर ‘लग्न’ आमिष; लाखोंची फसवणूक, बनावट ‘विराज भोसले’ अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील ‘विराज बाळासाहेब भोसले’ असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई आणि पुण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दहिसर, मुलुंड, नालासोपारा तसेच पुण्यातील महिलांशी संपर्क साधून आरोपीने स्वतःची ओळख ‘विराज भोसले’ अशी करून दिली. तो एका स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष असून वडील आयपीएस अधिकारी आहेत, तसेच सरकारी योजनांमध्ये ओळखी असल्याचे भासवत त्याने महिलांचा विश्वास संपादन केला.
स्वस्त दरात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने सुरुवातीला ‘टोकन’ रक्कम उकळली. त्यानंतर विविध कारणे सांगत मोठ्या रकमांची मागणी केली. पुण्यातील एका महिलेकडून सुमारे ६० लाख रुपये, नालासोपाऱ्यातील महिलेकडून ९.५० लाख, दहिसरमधील महिलेकडून १२ लाख, तर मुलुंडमधील महिलेकडून १८ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांत महिलांना वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडून आणखी पैसे घेतल्याचाही आरोप आहे.
पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने धमक्या देत शिवीगाळ केली, तसेच राजकीय व पोलीस ओळखीचा धाक दाखवला, अशी तक्रार पीडित महिलांनी केली आहे. एका तक्रारदार महिलेच्या मते, आरोपीने विविध कारणे सांगत तिच्याकडून रोख रक्कम आणि ‘मॅकबुक’सह एकूण सुमारे १२ लाखांची फसवणूक केली.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ‘विराज भोसले’ हे आरोपीचे खरे नाव नसून लोकांना फसवण्यासाठी तो बनावट ओळख वापरत होता. या प्रकरणात त्याच्या कुटुंबीयांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावरील तपासातून आणखी महिलांची याच पद्धतीने फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नवघर, दहिसर, नालासोपारा तसेच पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हे दाखल असून आतापर्यंत चार महिलांनी तक्रारी केल्या आहेत. सर्व प्रकरणांत एकच ‘मोडस ऑपरेंडी’ वापरण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.