मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा ३५ दिवसात बंद; ७ ते ८ तासांत कोकणात जाण्याच्या स्वप्नाला ब्रेक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कोकणात जाण्यासाठी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला. मुंबई ते विजयदुर्ग रो-रो प्रवाशांच्या सेवेत दाखल. मात्र, महाराष्ट्रातील बहुचर्चित मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा ३५ दिवसात बंद झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, गृह विभाग (बंदरे व परिवहन) महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे परिपत्रक काढत याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा दि. १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. एमटूएम फेरीज् प्रा. लि. कंपनीच्या “M2M प्रिन्सेस” या जहाजाद्वारे चालविण्यात येणाऱ्या या सेवेच्या माध्यमातून मुंबईहून विजयदुर्ग येथे केवळ ६ ते ७ तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. सदर फेरीसेवेच्या आतापर्यंत एकूण ६ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून मुंबईकडे परत येत असताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे, जहाजाच्या एकूण ४ इंजिनांपैकी सध्या केवळ 1 इंजिन कार्यरत असून उर्वरित ३ इंजिनांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या अनपेक्षित तांत्रिक बिघाडामुळे सदर फेरीसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
इंजिन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सुटे भाग परदेशातून मागविण्यात आले आहेत. तथापि, मध्य-पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीमुळे त्यांच्या पुरवठ्यात काहीसा विलंब होत आहे. अंदाजे १५ दिवसांत हे सुटे भाग प्राप्त होतील, त्यानंतर इंजिन दुरुस्तीसाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. जहाजाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून M2M Princess ची तपासणी करून ते प्रवासासाठी योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात येईल. त्यानंतरच वाहतूक सेवा पुन्हा कार्यान्वित केली जाईल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन, नियमांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ जहाजाच्या दुरुस्तीच्या कामावर सातत्याने देखरेख ठेवून आहे असे या परित्रकात म्हंटले आहे.
२ मार्च २०२६ रोजी बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ झाला. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग दरम्यानच्या पहिल्या रो- रो सेवेलापहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. हे जहाज दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ वाजता भाऊ का धक्का येथून मुंबईहून निघते आणि दुपारी २ वाजता विजयदुर्गला पोहोचते. गुरुवारी आणि रविवारी, हे जहाज विजयदुर्गहून दुपारी १२ वाजता निघते आणि सायंकाळी ६ वाजता मुंबईला पोहोचते. रो-पॅक्समधून एका वेळी ६५० प्रवासी आणि ३० वाहने वाहून नेली जाऊ शकतात. या जहाजातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ३,००० ते ९,००० दरम्यान शुल्क आकारले जाते.