‘तू राजूचा भाऊ आहेस ना?’ म्हणत सोन्याची चैन लंपास; सराईत आरोपी जेरबंद
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : बोलण्यात गुंतवून नागरिकांची फसवणूक करत सोन्याची चैन लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल ५९ गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
३० मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजता जोसेफ सी. ए. फर्नांडिस (वय ७१) हे गौरीशंकर मिठाई दुकानाजवळून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवले. “तू राजूचा भाऊ आहेस ना?” अशी खोटी ओळख सांगत त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर “मोठा माणूस आहे” असे सांगत गळ्यातील सोन्याची चैन पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून ती चोरून नेण्यात आली.
दरम्यान, संशय आल्याने फर्नांडिस यांनी आरडाओरडा केला. यावेळी एक आरोपी नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आला, तर त्याचा साथीदार सुमारे १२ ग्रॅम सोन्याची चैन घेऊन पसार झाला.
या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मुख्य आरोपी नरेश उर्फ नऱ्या विजयकुमार जयस्वाल (वय ४०) याचा शोध घेण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे तो कल्याण परिसरात असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात शहरातील विविध ठाण्यांत अनेक गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त घनश्याम पळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महाडीक, तपासी अधिकारी पो.उ.नि. सचिन बोरसे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.