नागपूरातील अथर्व मनोरे अपहरण-हत्या प्रकरणात तीन जण अटकेत; खंडणीसाठी मित्राचाच कट उघड
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण व हत्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अथर्वचा शेजारी व मित्रच असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त रविंद्र शिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम गोपाल यादव (वय १९) यानेच खंडणीसाठी अथर्वचे अपहरण करण्याचा कट रचला होता. त्याला केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (वय २०) आणि आयुष मोहन शाहू (वय २२) यांची साथ होती. आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाकडून ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव आखला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे २० दिवसांपासून या अपहरणाचा कट आखला जात होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतील गर्दीचा फायदा घेत गिट्टीखदान परिसरातून अथर्वचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह भरतवाडा परिसरात टाकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. मृतदेहाची विटंबना झाल्याचेही समोर आले असून या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती.
गेल्या तीन दिवसांपासून अथर्व बेपत्ता असल्याने कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चेही काढण्यात आले.
या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पहाटे कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेत मित्रानेच विश्वासघात करत खंडणीसाठी अपहरण आणि हत्या केल्याचे उघड झाल्याने नागपूर शहर हादरले आहे.