अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार!
गावठी-देशी दारूचा धंदा करणाऱ्यांची खैर नाही; पोलिसांचे ७५ ठिकाणी छापे
योगेश पांडे / वार्ताहर
अकोला – अकोला जिल्ह्यात गुन्हेगारांना अंकुश लावण्यात पोलिसांना यश येताना दिसून येत आहे.अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यात अवैध गावठी व देशी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे अवैद्य दारू विरोधात विशेष मोहीम पार पडली.यादरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पथकांनी एकत्रितपणे ही कारवाई करत अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात केला.या मोहिमेचा उद्देश जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालणे हा होता.या विशेष कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून संशयितांवर लक्ष ठेवले.अवैध दारू तयार करून विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली.पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकूण ७५ ठिकाणी कारवाई केली.कारवाईदरम्यान देशी दारूच्या ४६ प्रकरणांमध्ये जवळपास २ लाख ३ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गावठी हातभट्टी दारूच्या २९ प्रकरणांमध्ये ५ लाख ९९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.अशा प्रकारे एकूण ७५ गुन्हे नोंदवत सुमारे ८ लाख २ हजार ९३२ रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या दारूचा नाश करून संबंधित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.अवैध धंद्यात सामील असलेल्या व्यक्तींविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर मोठा आघात मानली जात आहे.
यादरम्यान,जिल्ह्यात अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो तसेच सामाजिक शांततेलाही बाधा पोहोचते.या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाने अशा अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले उचलत जनतेचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत.तसेच नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात अवैध दारू निर्मिती किंवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे,असे आवाहन अकोला पोलिसांकडून करण्यात आले आहे.कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगत अकोला पोलीस दल नेहमीच जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.