मुंबई वाहतूक पोलिसांनी उतरवले व्हीआयपींचे दिवे; खासगी वाहनांवरील दिवे उतरवतानाच त्यांच्या चालक आणि मालकांना दंड ठोठावले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महापौर रितू तावडे यांनी वाहनांवर लावलेल्या लाल-निळ्या फ्लॅश लाइटनंतर व्हीआयपींच्या वाहनांवरील दिवे पुन्हा चर्चेत आले होते. ही व्हीआयपी संस्कृती रडारवर आल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल ८० वाहनांवरील दिवे उतरविले. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, व्हीआयपी व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांच्या खासगी वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी या धडक मोहिमेत लाल, पिवळे आणि निळ्या रंगाचे ८० दिवे आणि तीन सायरन जप्त केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिस, पालिका, रुग्णालये, अग्निशमन दल अशा आपत्कालीन सेवा वगळता अन्य कुणालाही वाहनांवर कोणत्याही प्रकारचे दिवे वापरण्याची परवानगी नाही. असे असतानाही आमदार, खासदार, मंत्री, त्यांचे पीए तसेच राजकीय क्षेत्रातील इतर नेते आणि त्यांचे नातेवाईकही व्हीआयपी वागणूक मिळावी तसेच वाहतूककोंडीतून वाट काढण्यासाठी वाहनांवर लाल, पिवळे आणि निळ्या रंगाचे डोम लाइट्स (फ्लॅशिंग दिवे) लावून फिरताना दिसतात. याबाबत वाहतूक पोलिसांकडे वेगवेगळ्या माध्यमांतून सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यातच महापौर रितू तावडे यांच्या वाहनांवरील फ्लॅशिंग दिवे अधिकच चर्चेत आले.
वाहतूक पोलिसांनी वांद्रे आणि मरीन ड्राइव्ह परिसरात १ आणि २ एप्रिल रोजी विशेष मोहीम हाती घेतली. मरीन ड्राइव्ह वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारवाई करण्यात आली. तर, व्हीआयपी रेलचेल असलेल्या वांद्रे परिसरात सहायक पोलिस आयुक्त मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
खासगी वाहनावर कुणी पिवळा, निळा किंवा लाल रंगाचा दिवा अथवा फ्लॅशिंग लाइट लावले असल्याचे दिसल्यास त्याची तक्रार मुंबई किंवा वाहतूक पोलिसांच्या ‘एक्स’ अकाउंटवर किंवा वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.