सहाशे रुपयांवरून झालेल्या वादातून सात जणांवर ॲसिड हल्ला; आरोपी युवकांना अटक

Spread the love

सहाशे रुपयांवरून झालेल्या वादातून सात जणांवर ॲसिड हल्ला; आरोपी युवकांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – अवघ्या सहाशे रुपयांवरून झालेल्या वादातून एकाने सात जणांवर ॲसिड फेकल्याची घटना बुधवारी कुरार परिसरात घडली. या प्रकरणी समर बहाद्दूर सिंग (३८) याला अटक करण्यात आली आहे. त्याने फेकलेल्या ॲसिडमुळे सात जण भाजल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, सात ते आठ जणांवर सिंग याच्या तक्रारीवरून मारहाण आणि दंगल घडविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर बहाद्दूर सिंग याचे दागिने पॉलिश करण्याचे दुकान असून शेजारीच मयूर कनोजिया (२०) याचे दागिने तयार करण्याचे युनिट आहे. दोघांमध्ये नियमित कामाची देवाणघेवाण आणि पैशांचे व्यवहार व्हायचे. एका व्यवहारात कनोजियाने चुकून २६ हजार ४०० रुपयांऐवजी २७ हजार रुपये सिंगला दिले. त्यानंतर त्याने जास्त दिलेले सहाशे रुपये सिंगकडे परत मागितले. कनोजियाच्या वडिलांनी सिंगच्या दुकानात जाऊनही उर्वरित रकमेची मागणी केली, परंतु सिंगने अधिकचे पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेला कनोजिया हा त्याच्या सात-आठ मित्रांसह बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिंगच्या दुकानात गेला. सिंग याला सात ते आठ जणांनी मारहाण केली.

या दरम्यान सिंगने पॉलिशिंगसाठी वापरले जाणारे पाणीमिश्रित ॲसिड त्यांच्यावर फेकले. यामध्ये सात जण जखमी झाले आणि या सर्वांना कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच, कुरार पोलिस घटनास्थळी पोहोचले. सिंग याच्या तक्रारीवरून कनोजिया आणि त्याच्या साथीदारांवर, तर कनोजिया याच्या तक्रारीवरून सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींपैकी दोघांना घरी सोडण्यात आले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सिंग आणि हेमंत राठोड, नितीन धोबी यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon