“प्लास्टिक मुक्त बदलापूर”कडे निर्णायक पाऊल; १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर कडक बंदी

Spread the love

“प्लास्टिक मुक्त बदलापूर”कडे निर्णायक पाऊल; १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर कडक बंदी

पोलीस महानगर नेटवर्क

कुळगाव-बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषद हद्दीत बुधवार, १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची कडक अंमलबजावणी सुरू होत असून, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. अधिकृत कारवाई सुरू होण्यापूर्वीच शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शहरातील बहुतांश दुकानदारांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देणे थांबवले असून, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या अशा पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने सहा विशेष पथके स्थापन केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

यापूर्वी वारंवार नियम आणि सुधारणा करूनही प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. गटारे, नाले तसेच नैसर्गिक जलमार्गांमध्ये प्लास्टिक साचून पर्यावरणाला धोका निर्माण होत होता. विशेषतः उल्हास नदीत वाढलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी ‘प्लास्टिक मुक्त बदलापूर’चा संकल्प जाहीर केला होता. त्यानुसार आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होत असून, शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon