घटनेतील बदलांवरून राष्ट्रवादीत तणाव; सुनेत्रा पवार असमाधानी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घटनेतील बदलांवरून अंतर्गत तणाव तीव्र झाल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्या समाधानकारक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांकडे काही अधिकार देण्याबाबत तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र दिले होते. यानंतर सुनेत्रा पवार यांनी संबंधित पत्रव्यवहार अमान्य ठरवण्याची मागणी आयोगाकडे केली होती. या घडामोडींमुळे पक्षात दोन गट निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, वांद्रे येथे झालेल्या बैठकीत घटनेतील बदलांबाबत सुनेत्रा पवार यांना सविस्तर भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी तटकरे, पटेल, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र या स्पष्टीकरणानंतरही नाराजी कायम असल्याचे समजते.