उल्हासनगरकरांना मोठा दिलासा; अमली पदार्थ तस्करांच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

Spread the love

उल्हासनगरकरांना मोठा दिलासा; अमली पदार्थ तस्करांच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर

उल्हासनगर – उल्हासनगरमधील संजय गांधी नगर परिसरात स्कायवॉकच्या आडोशाला सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या काळ्या बाजारावर मध्यवर्ती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

कॅम्प तीन परिसरातील संजय गांधी नगर येथील स्कायवॉकखाली काही तरुण आणि तस्कर अमली पदार्थांची देवाणघेवाण करत असल्याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी अशोक रोकडे नावाच्या व्यक्तीला जाळ्यात ओढले. झडती घेतली असता आरोपीकडे सुमारे ७०० ग्रॅम गांजा सापडला, जो पोलिसांनी तत्काळ जप्त केला.

पोलिसांनी आरोपी अशोक रोकडे याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्यातील व्याप्ती लक्षात घेऊन तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला आणि उल्हासनगरमध्ये त्याचे आणखी कोणाशी लागेबांधे आहेत, याचा आम्ही कसून तपास करत आहोत. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध आमची ही मोहीम यापुढेही तीव्र राहणार आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon