वसईतील माणुसकीलाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना; मित्राने पैशांच्या वादातून निर्दयीपणे मित्राला संपवले

Spread the love

वसईतील माणुसकीलाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना; मित्राने पैशांच्या वादातून निर्दयीपणे मित्राला संपवले

योगेश पांडे / वार्ताहर

वसई – वसईत सापडलेल्या शिरविरहित मृतदेहाच्या प्रकरणाने केवळ गुन्हेगारीच नव्हे तर माणुसकीलाच काळिमा फासणारी धक्कादायक कहाणी उघड केली आहे. ज्या मित्रासोबत स्वप्न उभारत छोटासा व्यवसाय सुरू केला, त्याच मित्राने पैशांच्या वादातून निर्दयीपणे जीव घेतल्याचं समोर आलं आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार हद्दीत आंब्याच्या वाडीत गोणीत भरलेला शिर नसलेला मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र हातावरील ‘अशोक सिंग’ या टॅटूवरून ओळख पटली आणि तपासाची दिशा स्पष्ट झाली. अवघ्या १२ तासांच्या तपासात पोलिसांनी आरोपीपर्यंत धागा पकडला.

पोलिसांच्या चौकशीतील माहितीनुसार, नृत अशोक सिंग राजपूत आणि आरोपी दिनेशकुमार प्रजापती यांनी मिळून जाबरपाड्यात किराणा दुकान सुरू केलं होतं. अशोक सिंग आणि आरोपी दिनेशकुमार यांच्यात किराणा व्यवसायात भागीदारी होती. भागीदारीमधील आर्थिक वादातून दिनेशकुमार आणि त्याचा मित्र संदीप तिवारी या दोघांनी मिळून अशोक सिंगचा धारदार हत्याराने खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याचे शिर धडापासून वेगळे करून मृतदेह झाडाझुडपात फेकण्यात आला. तर शिर खाडी परिसरात टाकण्यात आले. पोलिसांनी तत्काळ ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवून खानिवडे गावाजवळ तानसा नदीकाठाजवळील झाडाझुडपात मृताचे शिर, मोबाईल फोन तसेच, इतर पुरावे गोळा केले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

पैशांच्या वादातून हा वाद टोकाला गेला आणि आरोपीने साथीदाराच्या मदतीने अशोकची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहाचे शीर वेगळे करून धड जंगलात तर शिर खानिवडे खाडीत फेकण्यात आले. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवत शीर, मोबाईल व इतर पुरावे ताब्यात घेतले. या प्रकरणी दिनेशकुमार प्रजापती आणि संदीप तिवारी या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मैत्री, विश्वास आणि पैशांमधील संघर्ष किती भयानक वळण घेऊ शकतो, याचे हे अंगावर शहारे आणणारे उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon