मालवणीत ३७ किलो गांजा जप्त; तिघे अटकेत, पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : अमली पदार्थांविरोधात मालवणी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३७ किलो गांजा जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (३१ मार्च) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मारावे रोड येथील पुनम रोज नर्सरी परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत असताना संशयित हालचाली आढळल्या. तपासणीदरम्यान आरोपींकडून विक्रीसाठी ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे १८ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत लवकुश वर्मा (२८), अंकित कुमार (२४) आणि सितू वर्मा (२४) यांना अटक करण्यात आली आहे. हे तिघे सध्या भिवंडी येथे वास्तव्यास असून मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ११ संदीप जाधव यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास सुरू असून अमली पदार्थांच्या साखळीचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
अमली पदार्थांचे वाढते जाळे विशेषतः युवकांना विळखा घालत असल्याने अशा कारवाया महत्त्वाच्या ठरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. युवकांचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित राहावे यासाठी अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.