सुनावणीनंतर वाद चिघळला; जातिवाचक शिवीगाळप्रकरणी १५ वकिलांवर गुन्हा

Spread the love

सुनावणीनंतर वाद चिघळला; जातिवाचक शिवीगाळप्रकरणी १५ वकिलांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर : कौटुंबिक वादातील खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालय परिसरात झालेल्या वादातून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आल्याने जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांसह १५ वकिलांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार नोंदविण्यात आला.

वारणा कोडोली (ता. पन्हाळा) येथील अश्विनी ऊर्फ पल्लवी निखिल पाटील (वय ३०) यांनी या प्रकरणी सर्किट बेंचकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना फिर्याद नोंदविण्याचे निर्देश दिले होते.

७ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान अश्विनी पाटील आणि ॲड. काजल शेळके यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर काही वकिलांनी एकत्र येत फिर्यादी पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाटील यांना आमच्या हवाली करण्याची मागणीही करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी जातिवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याविरोधातही शाहूपुरी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्किट बेंचच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यासह १५ जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon