देशभर फिरून घरफोड्या करणाऱ्या सराईत बांगलादेशी चोरट्याला पुणे पोलिसांनी वाराणसीतून ठोकल्या बेड्या

Spread the love

देशभर फिरून घरफोड्या करणाऱ्या सराईत बांगलादेशी चोरट्याला पुणे पोलिसांनी वाराणसीतून ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – रॉयल एनफिल्ड ‘हिमालयन’वरून देशभर फिरून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत बांगलादेशी चोरट्याला पुणे पोलिसांनी वाराणसीतून बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील कर्वेनगरमधील एका स्टुडिओत चोरी केल्यानंतर हा आरोपी तांत्रिक तपासाच्या जाळ्यात अडकला. धक्कादायक म्हणजे, हा चोरटा भारतात बनावट नावाने वावरत असून त्याच्यावर विविध राज्यांत ३६ गुन्हे दाखल आहेत. अलंकार पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कर्वेनगरमधील एका स्टुडिओत झालेल्या घरफोडीचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकवरून देशभर फिरत घरफोड्या करणारा बांगलादेशी सराईत गुन्हेगारच या चोरीमागे असल्याचे उघड झाले. अखेर अलंकार पोलिसांनी थेट वाराणसी गाठत त्याच्या मुसक्या आवळल्या.

१४ मार्चच्या मध्यरात्री कर्वेनगर परिसरातील फोटोग्राफी स्टुडिओची खिडकी फोडून आरोपीने आत प्रवेश केला होता. त्यानंतर कॅमेरे, लेन्स, ड्रोन आणि आयफोन असा सुमारे ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपीचा प्रवास उघड झाला. पुण्यातून तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर आणि मिर्झापूर असा मार्ग कापत उत्तर प्रदेशात पोहोचला होता. यानंतर अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.

महंमद बशर नूर महंमद (३८)असे अटक आरोपीचे नाव आहे. तो ‘नेवानाथ विनोदकुमार’ या बनावट नावाने भारतात वावरत असल्याचे समोर आले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल, विविध देशांचे चलन आणि बांगलादेशी पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेश आणि तेलंगणात एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २९ गुन्ह्यांमध्ये तो यापूर्वी अटकेत होता, तर काही प्रकरणांमध्ये तो फरार होता. दरम्यान, या चोरट्याने देशातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या घरफोड्या केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon