सरकारी जमिनीवरील ‘सत्यम बार’चा पुनर्जन्म; तीनदा तोडूनही पुन्हा उभारणी, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Spread the love

सरकारी जमिनीवरील ‘सत्यम बार’चा पुनर्जन्म; तीनदा तोडूनही पुन्हा उभारणी, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

दैनिक पोलीस महानगरकडून कारवाईसाठी वारंवार पाठपुरावा

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात अनधिकृत बारवर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान शुक्रवारी मोठा गोंधळ उडाला. तहसील विभागाच्या पथकाने ‘सत्यम उर्फ श्री गणेश बार’वर जेसीबीच्या साहाय्याने तोडकाम सुरू केले असता स्थानिक नागरिक आणि संबंधितांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तहसील पथक पोलीस बंदोबस्तात सकाळी कारवाईसाठी दाखल झाले. तोडकाम सुरू होताच नागरिक आणि बारशी संबंधित व्यक्तींनी आक्षेप घेत शाब्दिक चकमकीला सुरुवात केली. या वादाचे रूपांतर लवकरच गोंधळात झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. या प्रकरणी तहसील विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या बारवर यापूर्वीही दोन वेळा तोडकाम कारवाई करण्यात आली असून ही तिसरी कारवाई ठरली आहे. संबंधित बार सरकारी जमिनीवर उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रत्येक कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा बांधकाम करून बार सुरू केला जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या वारंवार होणाऱ्या ‘पुनर्जन्मा’मुळे संबंधित बार मालकाला कोणाचे पाठबळ आहे, याबाबत चर्चा रंगली आहे. कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण यांनी ही जागा तहसीलच्या अखत्यारीत असली तरी कार्यक्षेत्र महानगरपालिकेचे असल्याचे स्पष्ट केले. तहसीलकडून कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर पुन्हा उभारणी कशी होते, याबाबत समाधानकारक उत्तर नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचा हा प्रकार थांबवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon