खाकीवर काळा डाग: मुंबईत दोन पोलीस शिपायांवर ९.४५ लाखांच्या जबरी चोरीचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शहराच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलालाच काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोन पोलीस शिपायांसह पाच जणांच्या टोळीविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ९ लाख ४५ हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारदार सुमित आंबेकर (वय ३०), रा. विलेपार्ले (प.), हे वांद्रे येथील ट्रायोफॉरेक्स कंपनीत फॉरेन करन्सी डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. २५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजता जुहू परिसरात ते १० हजार अमेरिकन डॉलरची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
आंबेकर यांच्या तक्रारीनुसार, काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या खिशाची झडती घेत १० हजार अमेरिकन डॉलर काढून घेतले. तसेच मोबाईलचा पासवर्ड जबरदस्तीने मिळवून गाडीत बसलेल्या अन्य व्यक्तीने त्यांच्या बॅगेतील १५ हजार रुपयेही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेत दोन पोलीस शिपायांचा सहभाग समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर साथीदारांविरोधात जबरी चोरी, अपहरण व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.