चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; कारखाली चिरडून ठार

Spread the love

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; कारखाली चिरडून ठार

पोलीस महानगर नेटवर्क

बारामती/कलबुर्गी : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची भररस्त्यात अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे बारामतीसह परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील दाम्पत्य देवदर्शनासाठी कर्नाटकातील गाणगापूरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान कलबुर्गी जिल्ह्यातील बल्लुरगी गावाजवळ पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद अचानक चिघळत गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला चालत्या कारमधून खाली ओढत भररस्त्यात बेदम मारहाण केली.

या प्रकाराने हादरलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी पती शांत झाल्याचे भासवत होता. मात्र, नागरिक बाजूला होताच त्याने पुन्हा क्रूरतेचा कळस गाठत रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या पत्नीच्या अंगावर कार चालवली.
या भीषण प्रकारात २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा थरार काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही हत्या पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon