परदेशी नोकरीचे आमिष, प्रत्यक्षात गुलामी; आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, ‘कृष’ मुंबईत अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : भारतीय तरुणांना परदेशात उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘कृष’ याला मुंबईतून अटक करण्यात आली असून, त्याच्यावर म्यानमारमधील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये भारतीयांना विकण्याचे गंभीर आरोप आहेत.
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, ही टोळी भारतातील सुशिक्षित तरुणांना थायलंडमध्ये आकर्षक नोकरीचे आमिष दाखवत असे. पीडितांना प्रथम दिल्लीमार्गे बँकॉकला नेले जाई, त्यानंतर गुपचूप रस्त्याने म्यानमार येथील ‘के के पार्क’सारख्या कुख्यात सायबर गुन्हेगारी केंद्रांमध्ये पोहोचवले जात असे.
या ठिकाणी पोहोचल्यानंतर तरुणांना अक्षरशः कैदेत ठेवले जाई. त्यांच्याकडून “डिजिटल अरेस्ट”, रोमांस फ्रॉड आणि क्रिप्टो फसवणूक यांसारखे गुन्हे जबरदस्तीने करून घेतले जात होते. आदेश न पाळणाऱ्यांना अमानुष शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचेही समोर आले आहे.
२०२५ मध्ये काही पीडितांनी जीव धोक्यात घालून या नरकातून सुटका करून घेतली. थायलंड मार्गे भारतात परतल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारींवरून सीबीआयने तपास सुरू केला आणि ‘कृष’ची भूमिका उघडकीस आणली.
दरम्यान, आरोपी नुकताच भारतात परतल्याची माहिती मिळताच सीबीआयने सापळा रचून त्याला मुंबईत अटक केली. त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून, म्यानमार आणि कंबोडियातील मानवी तस्करीच्या ऑपरेशन्सशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले.
सीबीआयIच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कृष’ हा या जाळ्यातील प्रमुख दलाल आणि किंगपिन असून दक्षिण-पूर्व आशियात पीडितांची बेकायदेशीर वाहतूक आणि शोषण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.
या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी इतर आरोपी व विदेशी नागरिकांचा शोध सुरू असून, या संपूर्ण जाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे याचा तपास सीबीआयकडून वेगाने सुरू आहे.