स्वतःच्या मुलीने पोलीस प्रियकराच्या मदतीने पित्याची केली हत्या; ३ वर्षानी झाला उलगडा विधि संघर्षग्रस्त बालकासह चार जणांना अटक

Spread the love

स्वतःच्या मुलीने पोलीस प्रियकराच्या मदतीने पित्याची केली हत्या; ३ वर्षानी झाला उलगडा विधि संघर्षग्रस्त बालकासह चार जणांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

चंद्रपुर – प्रेमाला विरोध करणाऱ्या पोलीस पित्याची स्वतःच्या मुलीने पोलीस प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना तीन वर्षांनी चंद्रपुरात उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका विधि संघर्षग्रस्त बालकासह चार जणांना अटक केली आहे. जयंत बाल्लावार (४५) असे मृत पित्याचे नाव आहे. तर प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके (३०),कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार (२२),चैतन्य सचिन गेडाम (२२)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्याचे आशिष शेडमाके याच्याशी १३ वर्षापासून प्रेमसंबंध होते. या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता.या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तब्बल ३ वर्षांनी या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. मयत पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आर्या (आरोपी) ही देखील चंद्रपूर पोलीस विभागात पोलीस कर्मचारी आहे. तसच आरोपी आशिषला पोलीस ट्रेनिंग दरम्यान सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. मयत पोलीस कर्मचाऱ्याचा मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने मुलीने विष देऊन तिच्या वडिलांची हत्या केली. २५ एप्रिल २०२३ ला जयंत बाल्लावार (४५) यांचा ड्युटीवर असतांना जिल्हाधीकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. परंतु, त्यावेळी मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.

३ दिवसांपूर्वी मृताचा जावई आशिष शेडमाकेने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. पत्नी आर्या बाल्लावारने वडिलांना विष देऊन मारल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.पोलिसांच्या माहितीनुसार, जयंत बाल्लावार यांना ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्याने मिल्कशेक मध्ये विष मिसळले आणि ते वडिलांना पिण्यासाठी दिले. मिल्कशेक प्यायल्यानंतर जयंत बाल्लावार हे ड्युटी वर प्रशासकीय भवन मध्ये गेले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. २०२२ पासून प्रेमसंबंधात असलेल्या आर्या आणि आशिष यांच्या प्रेमाला जयंत बाल्लावार यांचा विरोध होता. त्यामुळे आर्याने आपला मावसभाऊ चैतन्य गेडाम (२२) याच्याकडून ५ हजार रुपयांना विष विकत घेतले होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केले. पण त्यानंतर त्यांच्या खटके उडू लागले. अशातच बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाकेला ट्रेनिंग दरम्यान बडतर्फ करण्यात आलं. ट्रेनिंगनंतर आर्या बाल्लावार सासरी न येता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिष शेडमाकेने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं.त्यानंतर रामनगर पोलिसांनी या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार आर्या बाल्लावारसह आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष विकत देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon