कणकवलीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ; डोक्यात गोळी लागल्याच्या खुणा
योगेश पांडे / वार्ताहर
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात शुक्रवारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आले. दळवी यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली असून, प्राथमिक अंदाजानुसार ही जखम बंदुकीच्या गोळीची असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
कणकवली मध्ये बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह शहरातील मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. प्रथमदर्शनी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेल्या अवस्थेत मृतदेह असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम दिसून येत असल्याने हा घातपात आहे की अन्य काही याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याचे दिसत असल्याने तसेच काही अंतरावर रक्तही पडलेले असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला आहे. फॉरेन्सिक टीम ही दाखल झाली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या मृतदेहामुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी मोहनमळा परिसरात सुशांत दळवी यांचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या काही अंतरावर रक्ताचे डाग सांडलेले असून, डोक्याला झालेल्या जखमेचे स्वरूप पाहता हा घातपात असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार हत्या आहे की अन्य काही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून पंचनामा सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. सुशांत दळवींसारख्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण कणकवली तालुक्यात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण पसरले आहे. कणकवली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि दळवी यांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.