नांदेडमध्ये ‘महाराजां’कडून लग्नाच्या आमिषाने अत्याचार; भाग्यनगर पोलिसांकडून अटक
पोलीस महानगर नेटवर्क
नांदेड : श्रद्धेचा गैरफायदा घेत एका ‘महाराजां’ने विधवा महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
शहरातील गाडीपुरा परिसरातील एका मठाचा मठाधिपती हरिगिरी दत्तगिरी महाराज (वय ३९) याने ४६ वर्षीय विधवा महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीडित महिला मे २०२५ पासून मठात दर्शनासाठी जात होती. श्रद्धेतून तिने संबंधित महाराजांना ‘गुरू’ मानले होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी संपर्क वाढवून तिला जाळ्यात ओढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
१४ जुलै २०२५ रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने आरोपी स्वतः पीडित महिलेच्या घरी गेला. तेथे त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर ही बाब कोणालाही सांगू नये, यासाठी लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, पीडित महिलेने लग्नाचा विषय उपस्थित केला असता ‘मी संन्यासी असल्याने लग्न करू शकत नाही,’ असे सांगत आरोपीने टाळाटाळ केल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने धाडस दाखवत पोलिसांत तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराज यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित मठाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.