जुहू गोळीबार प्रकरण: मुख्य सूत्रधार आग्र्यातून जेरबंद; मोक्का अंतर्गत कारवाई
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : जुहू परिसरातील सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून मुख्य पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता.
या प्रकरणात यापूर्वी १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मोक्का (MCOCA) कायदाही लागू करण्यात आला आहे. दरम्यान, २१ मार्च रोजी प्रदीप राधामोहन शर्मा उर्फ गोलू पंडित (वय २०) याला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली.
तपासादरम्यान, संबंधित आरोपीने गोळीबार करणाऱ्या इतर आरोपींना चिथावणी देत आर्थिक तसेच इतर स्वरूपाची मदत केल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला २२ मार्च रोजी विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.