परळीत १० वर्षांच्या शाळकरी मुलीवर किराणा दुकानात दोनदा अत्याचार; ५० वर्षीय नराधमाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड येथील परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत दोनवेळा एका ५० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पीडितेच्या घरच्यांना कळताच परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील धामपुरी येथील रहिवाशी अल्पवयीन पीडिता १० वर्षे वयाची असून ती इयत्ता ५ वी वर्गात शिक्षण घेत आहे. या पीडित नाबालिक मुलीस तिच्याच गावातील एका किराणा दुकानदाराने त्याच्या दुकानात बोलावून घेत तिच्यासोबत अत्याचार केला हा प्रकार दोन महिन्यापूर्वी देखील करण्यात आला आणि त्यानंतर त्या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला नाही.
याच कारणामुळे या नराधमाचा विश्वास बळावला आणि त्याने पुन्हा दोन महिन्यांनंतर आरोपी नराधम बालाजी पांचाळ (५०) याने लौंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे. या घटनेने पीडित चिमुकलीच्या नातेवाईकात संतापाची लाट पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी नराधमाला तात्काळ ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले असल्याचे समोर आले आहे.
सदर प्रकरणात पीडित नाबालिक चिमुकलीच्या आई-वडिलांनी परळी येथील ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. झालेला सर्व प्रकार संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ आरोपीविरोधात तत्काळ गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिलेल्या फिर्यादीत सांगण्यात आले आहे की, १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास दळण दळण्यासाठी गेली असता पुन्हा एकदा दुकानदार नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस गिरणीत आल्याचे पाहून तिला त्याच्या किराणा दुकानात बोलावून अत्याचार केला आणि पुन्हा त्या मुलीस याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई वडिलाना जीवे मारून टाकेल, अशी धमकीही दिली. या भीतीपोटी या चिमुकलीने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही.
मात्र मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पाहून मुलीच्या आईने त्या चिमुकल्या मुलीस विश्वासात घेऊन विचारले असता सर्व प्रकार सांगितला.रविवारी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोस्को अंतर्गत परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम बालाजी पांचाळ याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम पोस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणात एपी आय जाधवर तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणाचा तपास हा अंबाजोगाई येथील पिंक पथक करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.