अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर ५२ वर्षीय नराधमाकडून अत्याचाराचा प्रयत्न; संपूर्ण परिसरात संतापाची लाट
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यातील मुरुडपासून सुमारे ८ ते ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्यंत संतापजनक प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या मुलीला फूस लावून एका ५२ वर्षीय नराधम व्यक्तीने आपल्या घरी नेऊन अश्लील कृत्य केल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी ही घराखाली खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर लक्ष ठेवत तिला बोलावून घेतलं. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला आपल्या घरी नेलं. घरात नेल्यानंतर त्याने त्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नराधम एवढ्यावरच न थांबता आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून तिच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे.
या प्रकारानंतर मुलगी घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या कथनानंतर कुटुंबीय हादरले आणि त्यांनी तात्काळ मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. तसेच पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ७४, ७५ आणि ७६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांनी आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी समाजानेही सजग राहून संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रसेडे करीत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्यायालयासमोर उभे केलं जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.