महसूल विभागातील गैरवापराची कबुली; ७/१२ दुरुस्तीच्या नावाखाली २ लाख शेतकऱ्यांची फसवणूक

Spread the love

महसूल विभागातील गैरवापराची कबुली; ७/१२ दुरुस्तीच्या नावाखाली २ लाख शेतकऱ्यांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून कायद्यांतील तरतुदींचा गैरवापर करत ‘७/१२’ उताऱ्यात दुरुस्तीच्या नावाखाली राज्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणी राज्यभरातील सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून तीन महिन्यांत अहवाल सभागृहात सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकट्या पुणे विभागात सुमारे ३८ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली असून त्यापैकी २,३८३ प्रकरणांची तपासणी करण्यात आली. या तपासात १५२ अधिकारी दोषी आढळल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून अधिकारांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करत महसुली कलम १५५ चा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. या कलमांतर्गत ‘७/१२’ उताऱ्यातील नाव, नोंदी व शुद्धलेखन दुरुस्त करण्याची तरतूद असली, तरी त्याचा गैरफायदा घेत चुकीचे आदेश काढून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर बिल्डर किंवा धनिकांच्या नावे वळविणे, मालकीत फेरफार करणे तसेच जमिनीच्या हद्दीत बदल करणे अशा गंभीर तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्याचेही परब यांनी सांगितले. महसूल विभागातील काही अधिकारी आर्थिक फायद्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास हातभार लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व आरोपांवर उत्तर देताना बावनकुळे यांनी महसूल अधिनियमातील कलम १५५, १८२, २२० आणि २५७ यांचा गैरवापर झाल्याचे मान्य करत संबंधित प्रकरणांवर कठोर कारवाईचे संकेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon