मुलुंडमध्ये एमटीएनएल केबल चोरीचा कट उधळला; ९ जण अटकेत, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मुलुंड परिसरात एमटीएनएल केबल लुटण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीवर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना अटक केली. या कारवाईत सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपींसह १० जण अद्याप फरार आहेत.
मुलुंड पोलिसांनी १६ व १७ मार्चच्या मध्यरात्री ही कारवाई केली. उत्तर प्रदेशातील केबल चोरी करणारी टोळी आयशर वाहनासह एलबीएस मार्गावर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच शस्त्र कायदा व मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली व बिहार येथील मजूर व चालकांचा समावेश आहे.
अटक आरोपींकडून आयशर वाहन, हायड्रा (जेसीबी) यंत्र, तलवारी, चाकू, हातोडे, कटर मशीन यांसह विविध साधने जप्त करण्यात आली. तसेच एमटीएनएल केबलही जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मुंबईत एमटीएनएल केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. या चोरीत आंतरराज्यीय टोळ्यांसह स्थानिक गुंडांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाया तीव्र केल्या असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.