मोबाईलवरील डेटिंग ॲपवरून हनीट्रॅप’चा धक्कादायक प्रकार; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, तीन तरुणींसह एकूण १० जणांना अटक

Spread the love

मोबाईलवरील डेटिंग ॲपवरून हनीट्रॅप’चा धक्कादायक प्रकार; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, तीन तरुणींसह एकूण १० जणांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मोबाईलवरील डेटिंग ॲप तुम्हाला जोडीदार मिळवून देईलच असे नाही, तर तुम्हाला मोठ्या संकटातही ढकलू शकते. मुंबईच्या साकीनाका आणि पवई परिसरातून असाच एक ‘हनीट्रॅप’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिंडर या लोकप्रिय डेटिंग ॲपच्या माध्यमातून श्रीमंत तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना साकीनाक्यातील एका ठराविक कॅफेमध्ये नेऊन लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींसह एकूण १० जणांना अटक केली असून हे रॅकेट चालवण्यासाठी चक्क दिल्लीहून २५ ते ३० मुलींना मुंबईत आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. दिल्लीहून आणलेल्या या तरुणी टिंडर ॲपवर श्रीमंत तरुणांच्या प्रोफाईलना ‘लाईक’ द्यायच्या. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी (डेटिंग) घाटकोपर-साकीनाका येथील ‘कॅफे क्लब’मध्ये बोलावले जायचे. तिथे गेल्यानंतर या तरुणी अव्वाच्या सव्वा किंमतीच्या ऑर्डर्स द्यायच्या. साधा नाश्ता किंवा पेयांचे बिल २५ ते ५० हजार रुपयांच्या पुढे जायचे.

जर एखाद्या तरुणाने इतके अवाढव्य बिल भरण्यास नकार दिला, तर तिथे उपस्थित असलेले बाऊन्सर्स आणि कॅफे मालक त्या तरुणाला धाक दाखवून पैसे वसूल करायचे. इतकेच नव्हे तर संबंधित तरुणी त्या तरुणावर लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्याची किंवा पोलिसांत नेण्याची धमकी द्यायची. बदनामीच्या धाकाने अनेक तरुण मुकाट्याने पैसे देऊन तिथून सुटका करून घ्यायचे.

पवई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या कॅफेवर छापा टाकला. त्यावेळी एका पीडित तरुणाला जमिनीवर खाली बसवून बाऊन्सर्सच्या माध्यमातून त्याच्याकडून सक्तीने पैसे वसूल केले जात असल्याचे पोलिसांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कॅफे मालक, बाऊन्सर्स आणि दिल्लीहून आलेल्या तीन तरुणींसह १० जणांना अटक केली.

याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहचले असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत. समोरच्या व्यक्तीची माहिती एकदा वैयक्तिक पातळीवर नक्कीच तपासून पाहा. या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये गेलं तर नातं कसं असेल? याचा विचार करूनच मग पुढचे पाऊल उचला. त्यामुळे आपली माहिती तर खोटी नसावीच शिवाय समोरच्याची माहिती देखील व्यवस्थित तपासूनच पुढे जावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon