प.बंगालसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, ४ मे रोजी निकाल
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता पुढील तीन वर्षे राज्यात कुठल्याही मोठ्या निवडणुकांची बिगुल वाजणार नाही. मात्र, देशातील ५ राज्यात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जात असून केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. विशेष म्हणजे या ५ राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार, प. बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत असून २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
माझ्या प्रिय मतदारांनो, गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचा दौरा केला, तयारीचा आढावा घेतला. आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेतली, त्यांच्या सूचनांचा स्वीकार केला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, IG, DG यांची भेट घेतली. प्रशासनाने SIR साठी केलेल्या कामगिरीबद्दल BLO चे अभिनंदन केल्याचं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. निवडणुका होत असलेले पाचही राज्य भौगोलिक आणि सांस्कृतिक भारताच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करतात, असे म्हणत त्यांनी मतदारसंख्या आणि मतदान कर्मचारी, यंत्रणा याबाबत माहिती दिली.
आसाममध्ये सर्व १२५ मतदारसंघासात एकाच टप्प्यात, केरळमधील १४० विधानसभा आणि पद्दुचेरीतील ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर, तामिळनाडूतील २३४ विधानसभेसाठी देखील एकाच टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात १५२ आणि १४२ मतदारसंघात अनुक्रमे २३ आणि २९ एप्रिल मतदान होणार आहे. या सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी लागणार आहेत.
देशात निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या पाचही राज्यातील विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत आहे. गत २०२१ मध्ये या राज्यांमधील निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी, प. बंगालमध्ये ८ टप्प्यांत निवडणुका झाल्या, आसाममध्ये ३ टप्पे तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते.देशाच्या ५ राज्यातील मतदारांची संख्या एकूण १७.४ कोटी एवढी आहे, तर ८२४ एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या २.१९ लाख असून एकूण कर्मचारी २५ लाख कार्यरत आहेत, अशी माहितीही आयोगाने दिली.