विवाहबाह्य संबंधातून ब्लॅकमेलिंगचा संशय; पती-पत्नीने केली प्रियकराची हत्या, दोघांना अटक
योगेश पांडे /वार्ताहर
जळगाव : पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे एका महिलेने पतीच्या मदतीने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहबाह्य संबंधातून ब्लॅकमेलिंग होत असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी संशयित पती-पत्नीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भिमा राठोड (वय २५, रा. वरसाडे तांडा) हा तरुण २४ फेब्रुवारीच्या रात्री घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने त्याचा भाऊ संजय राठोड यांनी २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता तांत्रिक माहितीच्या आधारे संजय परशुराम जाधव याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या जाधव याने पोलिसांच्या कसून चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. माझी पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोडशी प्रेमसंबंध होते आणि त्यातून वाद निर्माण झाल्याने आम्ही दोघांनी मिळून त्याचा खून केला, अशी कबुली त्याने दिली.
दरम्यान, विजय राठोडची हत्या नेमकी कशी केली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत संशयित पती-पत्नी परस्परविरोधी माहिती देत असल्याने पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कधी गळा आवळल्याचे, तर कधी लोखंडी शस्त्राने वार केल्याचे ते सांगत आहेत. तसेच हत्येनंतर मृतदेह जाळून जंगलात फेकल्याचेही वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.
या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा पुढील तपास करत आहेत.